पांढरा, लाल, गुलाबी, फिकट जांभळ्या रंगात असलेली विशेषतः पावसाळ्यात फुलणारी ही नाजूक फुले बघितली की गुलाबाला स्पर्धा करतील की काय इतकी सुंदर दिसतात. तेरडा हा मूळचा भारतातलाच. याच्या फुलांना गणेशोत्सवामध्ये विशेष महत्व आहे. गणपती बरोबर येणाऱ्या गौरी मातेला विशेषकरून ही फुले अर्पण केली जातात. त्यामुळे या झाडाला गौरी किंवा गौरीची फुले किंवा गुलमेह्न्दी असे म्हटले जाते. त्याचा वापर गणपतीमध्ये माटोळीसाठीदेखील केला जातो. त्याची पत्री पूजेकरता वापरतात.
तेरड्याची फुले चार ते पाच दिवस ताजी राहतात. फुले येऊन गेली की छोटी फळे धरतात. याच्या फळांना हात लावल्यावर ती तडकतात आणि उडतात त्यामुळे याना "टच मी नॉट" असे देखील म्हणतात. यामुळेच लहान मुले दुसऱ्याना घाबरावयला यांचा वापर करतात.
पूर्वी फक्त पावसाळ्यातच हा फुलत असे, पण आता तो बहुवार्षिकही झाला आहे. तसेच नर्सरी मध्ये याचे हायब्रीड प्रकार देखील मिळतात पण देशी तेरड्याचे सौंदर्य काही निराळेच असते. तेरडा हे सरळ वाढणारे झाड. तेरड्याचे शास्त्रीय नाव ‘इंपेटिएन्स बाल्समिना’ आणि याचे कुल ‘बाल्सामिनेसी’ आहे. याची झुडपे उंच, गुळगुळीत, काहीशी लवदार, मांसल खोडाची, थोड्या व आखूड फांद्यांची असतात. तेरडा ही एक औषधी वनस्पती आहे. समुद्रसपाटीपासून १.५५० मी. उंचीपर्यंत भारतात सर्वत्र आढळते. जंगलात झाडाझुडपांच्या खाली भरपूर वाढते. महाराष्ट्रात पश्चिम घाट, कोकण, दख्खनमध्ये सापडले. आपली विशिष्ट प्रतिभा जपते.
बागेत शोभेकरिता हिचे अनेक प्रकार लागवडीत आहेत. पाने साधी, एकाआड एक, सुमारे १५ सेंमी. लांब दातेरी व भाल्यासारखी निमुळती असून देठावर प्रपिंडे (ग्रंथी) असतात. फुले एकाकी किंवा झुबक्यांनी पानांच्या बगलेत येतात. बोंडे सुमारे एक सेंमी. जाडीची व लवदार असून पूर्णावस्थेत धक्का लागल्यास त्वरित तडकून बिया आसपास फेकल्या जातात. तेरड्याच्या वंशातील सुमारे १५० जाती भारतात आढळतात.
तेरड्याच्या कॉक्सिनिया या लॅटिन नावाच्या प्रकारात पाने अधिक दातेरी व फुले मध्यम आकारमानाची असतात. ब्रेव्हिकॅलकॅराटा या नावाच्या प्रकारात पाने मूळच्या तेरड्यासारखी पण फुले बरीच लहान असतात.
कसे लावाल ?
तेरड्याची लागवड रोपे लावून करतात. सिंगल आणि डबल असे दोन प्रकार या मध्ये आहेत. याला कोणतीही जमीन चालते. मेमध्ये बी पेरल्यावर ऑगस्टमध्ये याची फुले मिळतात. पुढे ती अनेक दिवस मिळतात. फुलांचा हंगाम मात्र थोडे दिवस टिकतो. फुलांचा रंग लवकर विटतो. म्हणूनच तेरड्याचा रंग तीन दिवस असे म्हटले जाते. याला माफक पाणी लागते. फुले संपताच याला शेंगा लागतात. सहसा या झाडावर किडींचा प्रादुर्भाव होत नाही.
पावसाळ्यात कुंडीमध्ये देखील हे झाड लावता येते. मे ते जून महिन्यात याच्या बिया लावल्यास नाग पंचमी ते गणपती पासून फुले यायला सुरुवात होते.
एक पाच ते सहा इंचाची कुंडी घ्या. त्यामध्ये खाली भोके पाडून घ्या. आणि त्यावर खडी पसरा. यामुळे पाण्याच्या निचरा योग्य प्रकारे होईल. शेणखत, गांडूळ खत, माती आणि वाळू यांचे मिश्रण तयार करा. पाच सेमी अंतरावर बिया टाकून थोडीशी माती पसरा. येणाऱ्या ५ ते ८ दिवसात छोटी रोपे दिसू लागतील.
सूर्यप्रकाश
या फुलझाडाला अतिशय कमी म्हणजे अगदी १.५ ते २ तासाचा सूर्यप्रकाश लागतो. त्यामुळेच की काय पावसाळ्यात कित्येक दिवस सूर्य दर्शन नसताना देखील माळरानावर आणि कडे पठारावर या फुलांचे ताटवे भरलेले दिसतात. साताऱ्या जवळच्या कास पठारावर हे दृश्य खूप मोहक दिसते. जून मध्ये याच्या बिया लावल्याने श्रावणामध्ये पूजेला फुले येतात.
पाणी
अतिशय कमी पाण्यात हे झाड वाढते. पाऊस जास्त असला तरी पाण्याचा निचरा होणारी माती असल्यास हे झाड वाढते. नाहीतर झाडाची मुळे सडून झाड मरते.
खते
वर सांगितल्याप्रमाणे पॉटिंग मिक्स मध्ये झाड लावले तर चांगली वाढ होईल. तरीही आपण नायट्रोजन, फॉसफरस, आणि पोटॅशियम युक्त खते आणि डीएपी घालू शकता. ऑरगॅनिक खतांचा वापर करावयाचा झाल्यास अंड्याच्या सालीचा चुरा, कांदा साली चे पाणी, केळ्याच्या सालीचे खत, बोनमील, तसेच घरच्या घरी तयार केलेले कंपोस्ट अतिशय उपयुक्त ठरेल.
कीटकांचा प्रादुर्भाव
तेरड्याच्या झाडाला फार कमी कीटकांचा प्रादुर्भाव होतो. पावडरी माईल्ड्यू फंगस या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने झाड दगावते. त्यासाठी कडुनिंबाचे तेल साबणाच्या पाण्यात मिसळून फवारणी करावी.
औषधी आणि अन्य उपयोग
तेरडा हा पित्तशामक असून त्याची फुले पौष्टिक आणि थंड असतात. भाजलेल्या ठिकाणी लावल्यावर आराम पडतो. ही वनस्पती विरेचक (पोट साफ करणारी), मूत्रक (डाययुरेटिक म्हणजे शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकणारी), तसेच अर्थ्रायटिस साठी उपयोगी आहे. याच्या बियांपासून तेल निघते ज्याचा वापर खाण्यासाठी तसेच दिवा लावण्यासाठी होतो. बाली बेटांवर याची पाने खाल्ली जातात. मेंदीच्या पानांप्रमाणे याच्या फुले आणि पानांनी नखे रंगवली जातात. चीन मध्ये याच्या बियांच्या चूर्णाचा वापर सुलभ प्रसूती साठी केला जातो. फिलिपिन्स मध्ये यकन्या फुलांचा उपयोग कम्बर दुखी साठी केला जातो. कीडा किंवा साप चावल्यावर याच्या पानांचा रस लावल्यास फायदा होतो. हाड मोडल्यास याच्या पानांचे पोटीस लावले जाते. कफ बाहेर काढण्यासाठी याच्या बियांचा वापर होतो. तसेच कॅन्सर मध्ये देखील याचा उपयोग होतो असे बोलले जाते. याच्या फुलांमध्ये काही अँटीबायोटिक सारखे गुण सापडले आहेत ज्यामुळे काही बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट होतात.
महत्वाच्या टिप्स
मुबलक प्रमाणात पाणी आणि त्याचा योग्य निचरा होणारी कुंडी
शेणखत, गांडूळ खत आणि बोनमील
योग्य प्रमाणात सूर्य प्रकाश
झाड वाढू लागल्यावर २ जी कटिंग करावी म्हणजे भरपूर फांद्या येतील आणि जेवढ्या जास्त फांद्या तितकी जास्त फुले
वरील प्रमाणे गोष्टी आपण विचारात घेतल्या तर बागेमध्ये रंगबिरंगी फुले येतील आणि फुलांवर छान पक्षी आणि मधमाश्या बागडतील तसेच आपले उत्सव देखील छान साजरे करू.
खूपच छान.
Khup.chan