बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी
ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या, सुधीर फडक्यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि माणिक वर्मानी गायलेल्या या अजरामर गाण्याची ओळख मराठी मनाला नसेल तरच नवल. पारिजात म्हणताच या गाण्याचे शब्द मराठी मनात येतात. तसेच टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले ही कविता देखील आपल्यापैकी बऱ्याच जणांना शाळेमध्ये असेलच. या फुलाला प्राजक्त, परिजातक, हरसिंगार, शेफालिका, शेफाली, शिउली , आणि गुलज़ाफ़री अशी अनेक नावे आहेत. या फुलविषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
असे देखील मानले जाते की पारिजात वृक्षाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आणि त्याचे रोपण इंद्राने आपल्या वाटिके मध्ये केले. हरिवंशपुराणामध्ये या वृक्षाचा उल्लेख आहे, ज्याला स्पर्श केला असता उर्वशीचा नृत्यामुळे आलेला थकवा निघून जात असे. एकदा नारद मुनी या वृक्षाचे फुल घेऊन श्रीकृष्णाजवळ आले. श्रीकृष्णांनी ते फुल जवळच बसलेल्या आपल्या पत्नी रुक्मिणीला दिले. या नंतर नारदांनी हा प्रसंग श्रीकृष्णाच्या दुसऱ्या पत्नीला सत्यभामेला जाऊन सांगितला. सत्यभामेला नारदांनी सांगितले की इंद्रलोकीचे दिव्य फूल श्रीकृष्णांनी रुक्मिणीस दिले आहे. हे ऐकल्यावर सत्यभामेला राग येऊन तिने श्रीकृष्णास सांगितले की इंद्रलोकीचा हा वृक्ष मला हवा आहे. कृष्णाने तो वृक्ष इंद्रलोकांतून पृथ्वीवर आणला. असे म्हटले जाते की हा वृक्ष सत्यभामेच्या अंगणात असून त्याची फुले मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील पारिजात वाहिला जातो.
असे देखील मानले जाते की 'पारिजात' नावाची एक राजकुमारी होती, जिचे सूर्यावर प्रेम जडले. परंतु अथक परिश्रम करून देखील भगवान सूर्यांनी तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, ज्यामुळे तिने खिन्न होऊन आत्महत्या केली. आणि त्या राखेतून पारिजात नावाच्या वृक्षाचा जन्म झाला. त्यामुळेच पारिजातकाच्या वृक्षाला रात्रीच्या वेळेस पाहिल्यावर तो रडत आहे असे वाटते. पण सूर्योदय झाल्यावर पारिजाताच्या फांद्या आणि पाने सूर्याला मिठीत घेण्यास आतुर असल्या सारखे वाटतात.
याबरोबरच पारिजातकाचे हृदयरोग, ज्वर, कृमीनाशक, खोकला, संधिवात, तसेच चिकनगुनिया या आजारांमध्ये उपयोग आहेत.
बाराबंकी येथील पारिजात वृक्ष
पारिजात वृक्ष साधारणपणे १०-१२ फूट उंच वाढतो. परंतु उत्तर प्रदेश मधील बाराबंकीच्या रामनगर क्षेत्रातील बोरोलिया गावामध्ये ५० फूट रुंदीचा आणि ४५ फूट उंच असा मोठा पारिजात वृक्ष आहे.
या वृक्षाचे एक वैशिष्ट्य असे आहे की याच्या फांद्या जमिनीकडे झुकतात आणि जमिनीला स्पर्श करताच त्या सुकून जातात. विशेष करून पावसाळ्यात बहरणाऱ्या या वृक्षाच्या १२ महिने फुले देणाऱ्या प्रजाती देखील उपलब्ध आहेत.
Night flowering Jasmine असे इंग्रजी नाव असलेल्या या झाडाला Nyctanthes arbor-tristis असे शास्त्रीय नाव आहे. या फुलांचा सुगंध मंद पण दूरवर पसरणारा असा आहे. रात्री गळून पडणाऱ्या फुलांमुळे या झाडाला ट्री ऑफ सॉरो असेही म्हणतात. हे एकमेव फुल असे आहे की जे जमिनीवर पडून देखील देवास वाहिले जाते.
चार ते आठ पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि नारिंगी रंगाचे देठ असलेले फूल या सूर्यास्तानंतर उमलायला सुरुवात होते आणि रात्री ८ वाजेपर्यंत पूर्ण फुले फुललेली असतात आणि सकाळी सूर्योदयापूर्वी फुले गळून पडतात.
आता हे झाड मोठ्या १०-१२ फुटापर्यंत वाढत असल्याने कुंडीमध्ये कसे लावणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. माझ्या घरातील बाल्कनीमध्ये मी हे झाड लावले असून छोट्याशा झाडास रोज किमान १५ ते २० तर कधीकधी ४० ते ५० फुले सहज येतात. कशा प्रकारे या झाडाची जोपासना कुंडी मध्ये करता येते ते आता पाहूया.
कसे लावाल
आठ ते २० इंचाच्या कुंडीमध्ये पारिजातक सहज लावता येते. पारिजाताकास वाळूमिश्रित माती खूप गरजेची असते. झाड लावताना कुंडीला ५ ते ६ छिद्रे पाडून घ्या. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पहिले त्या कुंडीमध्ये खडीचा एक थर पसरा. नंतर शेणखत, गांडूळ खत, नदीतील बारीक वाळू निंबोळी पेंड यांचे मिश्रण बनवून घ्या. थोडा थर मग पसरा. नंतर रोपवाटिकेतून आणलेल्या रोपाची प्लॅस्टिक पिशवी काढून मातीसकट ते रोप कुंडीमध्ये ठेवा. नंतर वरील मिश्रणाने कुंडी भरून घ्या.
कुंडीचे पुनर्भरण
दर वर्षी पावसाळ्यापूर्वी कुंडीतील माती, नदीतील वाळू बदलणे गरजेचे आहे. हे करताना छोटी मुळे कापून टाकल्यास त्याच कुंडीमध्ये झाड लावता येते. नंतर कंपोस्ट, शेणखत घातल्यास छान फुले येतात. माझ्याकडे गेली दोन वर्षे एकाच ८ इंचाच्या कुंडीत हे झाड आहे. या झाडाचे बोन्साय देखील करता येते. पण जमिनीत लावल्यास उत्तम.
सूर्यप्रकाश
पारिजातकाच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. या झाडाला कमीतकमी ४ ते ८ तास उन्हाची गरज असते. चार तासापेक्षा कमी सूर्यप्रकाश असेल तर फुले येणारच नाहीत किंवा कमी येतील. आधीच्या लेखात सांगितल्या प्रमाणे जास्त सूर्यप्रकाश तर जास्त फुले हे लक्षात असू द्या. कडक उन्हाळ्यात दुपारचे ऊन नाही दिले तरी चालेल.
पाणी
जास्त प्रमाणात घातलेले पाणी या झाडाचा शत्रू आहे. कुंडीत पाणी जास्त झाले तर याची मुळे सडतात आणि झाड दगावते. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे पाण्याचा निचरा करणारी माती गरजेची असते. झाड कुंडीत असल्याने रोज पाणी द्यावे पण माती ओलसर असल्यास पाणी घालणे टाळावे.
खते
पारिजातकाचे झाड वाढविण्यास अतिशय सोपे आहे. भरपूर शेणखत आणि गांडूळ खत टाकल्यास भरपूर फुले येतील. आणि तरीदेखील फुले येत नसल्यास पोटॅशयुक्त खतांचा वापर करू शकता किंवा कांद्याचे पाणी आणि केळ्याच्या वाळलेल्या सालीचे खत वापरू शकता. हे करून देखील फुले येत नसल्यास फॉसफरस पुरवठा करणारे बोनमिल वापरावे, उत्तम परिणाम दिसेल.
किडींचा प्रादुर्भाव
लीफ मायनर, अफीड्स, माईट्स, आणि फ्लाईज या किडींची लागण या झाडास होते. मी हे झाड लावल्यानंतर एकदा व्हाईट फ्लाईज झाले होते. तेव्हा पाण्याचा जोरदार फवारा करून झाड धुतल्यास किडीचा प्रभाव नष्ट होतो. कडुनिंबाचे तेल आणि साबणाचे पाणी एकत्र करून मारल्यास बऱ्याच किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो.
नवीन रोप तयार करणे
फांदी पासून लेयरिंग पद्धतीने किंवा फांदीच्या कटिंग पासून किंवा बियांपासून पारिजाताचे नवीन रोप तयार करता येऊ शकते. बीज रुजायला साधारण १५ ते २० दिवस जातात. फांदीपासून लावल्यास १ महिन्यामध्ये नवीन रोप तयार होते. पारिजातकाची फांदी पाण्यात ठेवल्यास ७ दिवसात टोकाला पांढरे दाणे दिसू लागतील त्यानंतर कोकोपीट आणि वाळू मिश्रित माती मध्ये ती फांदी लावल्यास नवीन रोप तयार होईल. नवीन रोप लावल्यास ६ ते ८ महिन्यांमध्ये फुले येतात.
महत्वाच्या टिप्स
कल्पवृक्ष असे म्हटले गेल्याने हे झाड फार लवकर वाढते त्यामुळे सुरुवातीस लावताना मोठ्या कुंडीत लावणे गरजेचे आहे
वेळोवेळी कुंडीचे पुनर्भरण करावे आणि ते करताना मुळे छाटावीत म्हणजे छोट्या कुंडीत छान झाड तयार होईल
शेणखत आणि गांडूळ खत यांचा योग्य वापर केल्याने झाडाची वाढ छान होते
केळ्याच्या सालीचे तुकडे वाळवून त्याची पूड करून टाकल्यास झाडास लवकर फुले लागतात
अशा या सुंदर वृक्षाची फुले स्त्रिया व मुली सकाळी सकाळी परडीत वेचतात आणि त्यांच्या माळा दो-यात गुंफतात. त्यामुळे सकाळ मात्र सुगंधित आणि मंगल वाटते आणि आपले मन कसे उल्हसित व प्रसन्न होते.
मित्रहो तुम्हाला माझे लेख तर आवडत असल्याची पोच पावती तुम्ही देतात आहातच. म्हणूनच प्राजक्ताच्या सुंगंधासम ही मैत्री अखंड अबाधित ठेऊया.
या प्रसंगी मला एक कविता सुचतेय ती खालीलप्रमाणे आहे
उगवत्या दिनकरासम तेजस्वी ही
आपली मित्रता तळपत राहो सदैव ही ।
प्राजक्ताच्या फुलांसम ती फुलेल ही,
बहरेल ही अन सुगंधित करू दे आसमंत ही ।
मित्रांनो हा लेख तसेच माझ्या वेबसाईट वरील सर्व लेख तुम्हाला आवडल्यास जरूर लाईक करा, माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि अर्थातच प्रतिक्रिया द्यायला देखील विसरू नका ! धन्यवाद !
अप्रतिम लिहिले आहे मित्रा.वाचून खूप आनंद झाला
Khup Chan mahiti... N likhan.....
अप्रतिम लिखाण बॉस ❤️❤️❤️
I was unaware about it's mythology connection...nice..