top of page
Writer's pictureSachin Waykar

पवित्रता, मादकता आणि मोहकता: मोगरा (मदनबाण)

Updated: May 16, 2020

गुढीपाडव्याची पहाट ! घरात लवकर आवरून मस्तपैकी टीव्ही लावला आणि लतादीदींचा स्वर कानी पडला


मोगरा फुलला .. मोगरा फुलला  | फुले वेचिता बहरू कळीयासी आला ||

 

ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द आणि लतादीदींचा आवाज इतका सुंदर दुग्धशर्करा योग्य जुळून यायला मराठी म्हणून जन्म घ्यावा लागतो आणि म्हणूनच त्याचा अभिमान वाटतो.  लतादीदींना जसे मोगऱ्याची फुले वाहताना मी बघितल तस मनाशी ठरविल की माझ्याकडेही मोगरा हवाच .. आणि मग माझ्यातल्या कवीमनाला छोटीशीच चारोळी सुचली    मनात माझ्या मनामनाच्या मनामनात मानिला  ।

मदनबाण मोगरा मोहुनी मनाला मज मनी महकला  ।। मंडळी सौंदर्याची जशी परिभाषा असते, म्हणजे तुळशी वृदांवनाला पाणी घालणारी देखील सुंदर सुशील स्त्रीच असते आणि लावणी किंवा चित्रपटात दाखवलेली लावण्यवती देखील स्त्रीच असते पण ज्याचं त्याच वेगळेपण नाही का ? तसेच सुगंधाचं देखील आहे. हा सुगंध देखील मादक पासून ते मनाला शांती देणारा पावित्र्य दायक अशा अनेक छटा घेऊन येतो. जाई, जुई, मोगरा, मालती, चाफा, बकुळी, शेवंती आणि पारिजातक या भारतीय सुगंधी फुलांच्या मांदियाळी मध्ये मोगरा हे सर्व ठिकाणी नाव पटकावून आपला पहिला नंबर ठेवून आहे. जसा   ज्ञानेश्वर माऊलींसारख्या देवाच्या चरणी सुगंधी फुल म्हणून तो जाऊन बसला तसंच तो एखाद्या सुंदर नायकिणीच्या केसातला गजरा म्हणून देखील बसला आणि इतकेच काय लग्नासारख्या मंगल प्रसंगी प्रत्येक सुवासिनीच्या केसातील स्थान अबाधित ठेवून बसला.    अनेक साहित्यिक त्यांच्या प्रतिभावान लेखणीने मोगऱ्याची स्तुती करते झाले. त्यामुळेच मोगऱ्याची खरी कीर्ती सगळी कडे पसरली. मित्रहो मोगऱ्याची खरी शेती होते कर्नाटकातल्या अथणी जवळ. संध्याकाळी मोगऱ्याची फुले खुडून तिथून निघणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन (NWKSRTC) च्या गाड्यांच्या सीट्सच्या खाली तसेच छतावरून हा मोगरा पुणे, मुंबई ला पोचतो.  पूर्ण गाडी सुगंधाने भरून जाणे म्हणजे काय ते अनुभवावं ते इथे. एकदा कोल्हापूरहुन येत असताना मला या सुगंधी गाडीचा प्रवास करण्याचे भाग्य लाभले.  अशीच मोगऱ्याची शेती उत्तर प्रदेशच्या कन्नोज भागात होते आणि तेथेच अस्सल मोगऱ्याचे वाफेच्या डिस्टीलेशन पद्धतीने अत्तर केले जाते. असा हा सुगंधी साथीदार माझ्या बाल्कनीतल्या बागेतील मोक्याची जागा गेली ४-५ वर्षे बळकावून आहे. एका वेळेस ५०  ते ६० फुले आणि तीही बाराही महिने ! नलवलच नाही का ? ही किमया कशी साध्य केली ते आजच्या लेखात पाहूया !   मोगऱ्याच्या बट मोगरा, हजारी मोगरा, मदनबाण इत्यादी प्रजाती आहेत. पण मदनबाण हा बारामहिने फुले देणारा आहे. Jasmin Sambac Madanban असे त्याचे शास्त्रीय नाव आहे.  कसे लावाल ? साधारण ६ ते १८ इंचाच्या किंवा प्लॅस्टिकच्या  कुंडीला ५ ते ६ छिद्रे पाडून घ्या. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पहिले त्या कुंडीमध्ये खडीचा एक थर पसरा. नंतर भरपूर शेणखत, गांडूळ खत, नदीतील वाळू निंबोळी पेंड यांचे मिश्रण बनवून घ्या. थोडा थर मग पसरा. नंतर  रोपवाटिकेतून आणलेल्या रोपाची प्लॅस्टिक पिशवी काढून मातीसकट ते रोप कुंडीमध्ये ठेवा. नंतर वरील मिश्रणाने कुंडी भरून घ्या. मोगऱ्याच्या झाडाला भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक असते त्यामुळे वाळू आणि खडे युक्त माती योग्य ठरते. तसेच या झाडाला फुले येण्यात मातीच्या सामूचा (पीएच) चा मोठा वाटा असतो. हा पीएच आम्लयुक्त (ऍसिडिक) असेल तरच फुले येतात. त्यामुळे मोगऱ्यास फुले येत नसल्यास लिंबाचे किंवा तुरटीचे पाणी घालू शकता. लगेचच फरक जाणवेल. सूर्यप्रकाश  इतर सर्व झाडांप्रमाणेमोगऱ्याच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. सूर्य प्रकाश कमी असेल तर मोगऱ्याच्या टोकाकडील फांद्या उंच उंच वाढतात जेणेकरून झाडाला सूर्यदर्शन होऊ शकेल. या झाडाला कमीतकमी ४ ते ८ तास उन्हाची गरज असते. चार तासापेक्षा कमी सूर्यप्रकाश असेल तर फुले येणारच नाहीत किंवा कमी येतील. आधीच्या लेखात सांगितल्या प्रमाणे जास्त सूर्यप्रकाश तर जास्त फुले हे लक्षात असू द्या.   पाणी  जरी या झाडास ऊन प्रखर असणे  प्रिय असले तरी पाणीही तेवढेच महत्वाचे आहे. मोगऱ्याला ओलावा धरून ठेवणारी पण पाण्याचा निचरा होणारी मातीची आवश्यकता असते. जर पाणी कमी असेल तर झाडाची पाने पिवळी पडून गळू लागतील. पाणी जर जास्त झाले तर झाडाच्या मुळांच्या व्यवस्थेला धक्का बसतो आणि मुळे सडू लागतात परिणामतः झाड शेवटच्या घटका मोजू लागते आणि शेवटी मरते. त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन महत्वाचे.  खते  सुवासिक झाड असल्याने आपल्याला या झाडाला खूप फुले यावीत असे वाटत असते. म्हणूनच मोगऱ्याच्या झाडाला योग्य आणि वेळोवेळी खताची  गरज असते.  यासाठी नायट्रोजन, फॉसफरस, आणि पोटॅशियम युक्त खताचा वापर करणे गरजेचे असते. यामध्ये पोटॅशियमची गरज फुले येण्यास जास्त असते. त्याबरोबरच या झाडास कॅल्शियमची गरज असते. त्यामुळे अंड्याच्या कवचाचा चुरा किंवा बोनमील खत वापरू शकता. तसेच कांद्याच्या आणि केळाच्या सालीचे पाणी देखील वापरावे. याबरोबरच उकडलेल्या अंड्याच्या पाण्यामध्ये लिंबाचे ८ ते १० थेम्ब टाकून झाडास घालू शकता यामुळे पीएच चा समतोल राखला जाईल तसेच कॅल्शियम देखील मिळेल.  कीटकांचा प्रादुर्भाव  मोगऱ्याच्या झाडास फारच कमी किडींचा प्रादुर्भाव होतो. कळ्या भुरकट रंगाच्या होणे, पांढरा मावा (व्हाईट फ्लाय), पाने गळून पडणे ही किडीची लक्षणे होत. यासाठी कांद्याचे पाणी, लसणाचे पाणी, तसेच पाण्याच्या फवाऱ्याचे झाड धुणे यांचा उपयोग होतो.  नवीन रोप तयार करणे  मोगऱ्याच्या फांदीच्या पासून तुम्ही नवीन रोप तयार करू शकता. तसेच ग्राफ्टिंग किंवा एअर लेयरिंग तंत्रानेही नवीन रोप तयार करता येते. शक्यतो पावसाळ्यात थोडी कडक पण जास्त नवीन नसलेली फांदी घेऊन दालचिनीच्या पाण्यात २-३ तास भिजवत ठेवा. नंतर तिला माती किंवा कोकोपीट असलेल्या कुंडीमध्ये  लावा. रोप लावल्यावर सुमारे २० ते २५ दिवसात नवीन फुटवे येतात आणि येणाऱ्या ६ ते ८ महिन्यात फुले येतील.  महत्वाच्या टिप्स 

  • मोगऱ्याची फुले नेहमी नवीन फांदीवर जास्त येतात त्यामुळे झाडाला वेळोवेळी छाटणे गरजेचे आहे. जेवढ्या जास्त नवीन फांद्या तेवढी जास्त फुले येतात 

  • झाड वाढायचे थांबले असल्यास हा उपाय जरूर करून बघा. झाडाला ३ ते ४ दिवस पाणी घालू नका आणि झाडाच्या फांद्या कापून सगळी पाने काढून टाका. नंतर पाणी पुन्हा सुरु करून येणाऱ्या ८ दिवसात पुन्हा फुले येऊ लागतील. 

  • पीएच चे प्रमाण ऍसिडिक असणे गरजेचे असते. त्यामुळे तुरटी किंवा लिंबाचे पाणी यासाठी फायदेशीर ठरेल.    

  • कांद्याची साल आणि केळीच्या सालीचे पाणी देखील खूप उपयुक्त खत असल्याने त्याचा नेहमी वापर करावा 

मित्रहो अशा या सुगंधी फुलाला तुम्हाला आपलंसं करणं आता सोपं जाईल याची मला खात्री आहे.  अशा माझ्या देवघरातील देवांची शोभा वाढविणाऱ्या मदनबाणावर मला कविता सुचली नाही तरच नवल !  आलो कोठून कोठे शोधीत गंध कशाचा  कळले मला त्वरेने  हा सुगंध मोगऱ्याचा   ।। मदनाचा बाण जसा की  तितकाच घाव माझ्या  मनी लागला जसा की  आला शहारा तनाचा  ।।  गेलो पाहावयाला  भरला मनीच माझ्या  शुभ्रता तशी तयाची  भास दिला चंद्राचा  ।। गुंफूनि हार तयाचा  वाहिला देवास मी  आली त्वरित मजला  अनुभूती तयाची  ।।  मित्रांनो हा लेख तसेच माझ्या वेबसाईट वरील सर्व लेख तुम्हाला आवडल्यास जरूर लाईक करा, माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि अर्थातच प्रतिक्रिया द्यायला देखील विसरू नका ! धन्यवाद ! 

1,000 views14 comments

Recent Posts

See All

14 Comments


mhatresurajj
May 19, 2020

लेखणीत पण सुवास दरवळतोय !

All the best.

Suraj Mhatre

Like

mhatresurajj
May 19, 2020

खुप छान

Like

shakuntalawaykar
May 17, 2020

Khupach Chan mahiti

Like

abkarmarkar
May 17, 2020

Amazing article. Poems are nicely written. Keep it up

Like

patwardhan62
May 16, 2020

खूप छान, माहिती पूर्ण लेख.

Like
Post: Blog2_Post
bottom of page