top of page
  • Writer's pictureSachin Waykar

जपाकुसुम अर्थात जास्वंद : लागवड आणि इतर माहिती




जपाकुसुम संकाशमं काश्यपेयं  महद्युदितीम  ।

तमोरी सर्व पापघ्नम प्रणतोस्मि दिवाकरम  ।।  जास्वंदीच्या (जपा - संस्कृत मध्ये)  फुलाप्रमाणे लाल अंग कांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशात जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणाऱ्या दिवाकराला (म्हणजेच  दिवसाच्या राजाला  = सूर्याला) मी नमस्कार करतो  ... 

या नवग्रह स्तोत्रातल्या पहिल्याच श्लोकाने अगदी लहान पाणीच  मला या तेजस्वीअशा जास्वंदीची ओळख करून दिली आणि त्या फुलासारखंच तेजस्वी होण्याची आणि लखलखीत आयुष्य जगण्याची प्रेरणा मला दिली. 


मित्रहो तर या अशा तेजस्वी जास्वंदीची आज आपण ओळख करून घेणार आहोत. जास्वंदी ही वनस्पती झुडपं वर्गातील असून आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला वाहिली जात असल्याने सर्वांच्या परिचयाची आहेच.  म्हणूनच की काय तर अंगणातील किंवा बाल्कनीमधील बाग फुलवायचे निश्चित केल्यावर पहिला क्रमांक हा या वनस्पतीचा लागतो. 


मुंबई सारख्या महानगरात जन्म घेतला कि पु. ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे एक वेळ जेवायला मिळेल पण राहायला जागा मिळणार नाही हे खरेच नाही का ? मग जर राहायला जागा नाही तर झाडे लावण्याची मनाची कसोटी पाहणारी, वेळखाऊ, अत्यंत कष्टाची आवड जोपासणे हे तर शिवधनुष्य पेलण्या सारखेच म्हणावे लागेल. पण नावच सचिन असल्याने (तेंडुलकर नसलो तरी) हरायचे नाही  हे माझ्या रक्तातच आहे. म्हणूनच की काय म्हणा तर मुंबईतल्या घराच्या बाल्कनी मध्ये अनेक झाडे लावण्याची आणि ती जगविण्याची कमाल करायचे मी ठरवले. आणि तेही कुंडी मध्ये बरं का ! गेले १० -१२  वर्षे पेक्षा जास्त काळ मी जास्वंद तसेच इतर झाडे कुंड्यांमध्ये जोपासत आलो आहे. आणि त्यातील अनुभवांची शिदोरी आपल्या समोर एकएका लेखाच्या माध्यमातून उलगडाणार आहे. चला तर मग ! 

सर्वांच्या परिचयाच्या असणाऱ्या या फुलझाडाच्या भारतातच जवळपास २५ ते ३० प्रजाती असून या झाडास येणाऱ्या फुलांना पाच, सहा, चोवीस किंवा छत्तीस पाकळ्या असतात. भारत देशामध्ये याचे लाल, पिवळा, गुलाबी, सफेद, नारंगी, निळा असे अनेक रंग आढळतात. माझ्या बाल्कनीमध्ये सुमारे २० प्रकारची जास्वंद आहेत.  तुम्हाला वाचून आश्यर्य वाटेल की भारतातील या फुलाच्या प्रेमात परदेशी लोक देखील पडले नसतील तरच नवल. परदेशामध्ये तैवान, अमेरिका, आणि युरोप येथे देखील यांच्या वेगवेगळ्या सुमारे ५० एक प्रजाती आहेत.  ऐकून धक्काच बसला ना ? अहो त्यामुळेच की काय या फुलाची स्पर्धा आपल्या लाडक्या गुलाबाशी आहे हे खरं ! 


हिबिस्कस रोझा सायनेन्सिस म्हणजे चायनीज रोझ (गुलाब) (आपल्याकडे ज्याला चिनी गुलाब म्हणतात ते झाड हे नव्हे बरंका)  असे शास्त्रीय नाव धारण करणाऱ्या या फुलाला शू फ्लॉवर म्हणतात. या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट सांगतो. पादत्राणांचा शोध लागल्या नंतर त्यांची काळजी घेणं हे देखील आलंच नाही का ? चीन मध्ये मग या बुटांना पॉलिश करण्यासाठी वेगवेगळी तेले आणि बरेच काही वापरले जाऊ लागले मग कोणीतरी बागेत उगवलेले जास्वंदीचे फुल घासले बुटांवर आणि आश्चर्य म्हणजे बूट चमकले देखील ! मग याच नावाने ते चीनमध्ये ओळखले जाऊ लागले. या फुलास मलेशिया, आणि हैती या देशांच्या राष्ट्रीय फुलांचा दर्जा आहे.


आता म्हणाल इतके सगळे सांगितले, आता झाडाला कसे लावायचे आणि वाढवायचे ते बघूया आता. 


जास्वंद कशी लावाल ?

सुमारे १० फुटांपर्यंत उंच वाढणारे हे झाड कुंडीत वाढवायचे असेल तर त्याला छाटत राहिल्यास आपल्याला हवा तसा आकार ठेवता येऊ शकतो. एका चार इंच्या कुंडी पासून ते १८ इंचाच्या कुंडीपर्यंत जास्वंद लावता येते. कुंडी ही शक्यतो मातीची किंवा प्लॅस्टिकची असा वी. त्या कुंडीला ५ ते सहा छिद्रे पाडा. आणि त्यावर मध्यम आकाराच्या खडीचा एक थर पसरा. त्यानंतर त्यावर मातीमिश्रित कडुनिंबाची निंबोळी पेंड किंवा पावडर किंवा ती नसेल तर बोरिक पावडर टाका. यामुळे झाडाच्या मुळांना  फंगसची लागण होत नाही. रोपवाटिकेमधून आणलेले झाड प्लॅस्टिक बॅगेमधून वेगळे करून मुळांचा गठ्ठा अलगदपणे फारसा धक्का न लावता त्यावर ठेवा. आणि मग त्या बाजूने ३०% टक्के माती, ३०% टक्के नदीतील वाळू, १०% शेणखत किंवा कम्पोस्ट, १०% गांडूळ खत, आणि नारळापासून बनविलेले कोकोपीट २०% इतके सर्व मिश्रण बाजूने टाका आणि कुंडी भरून घ्या. लक्षात ठेवा कुंडी पूर्णपणे न भरता पाणी घालण्यास थोडी जागा ठेवा नाहीतर पाणी घालताना कुंडीतून बाहेर पडेल. 


सूर्य प्रकाश

जास्वंदीच्या झाडाला कमीतकमी २.५ तासापासून जास्तीत जास्त ८ तास सूर्य प्रकाशाची गरज असते. सूर्य प्रकाशामुळे झाडाची वाढ चांगली होते याचे कारण झाडाच्या पानांना त्यांचे अन्न क्लोरोफील च्या माध्यमातून तयार करता येते. तसे पाहायला गेले तर जास्वंद हे उष्ण कटिबंधातील असल्याने त्याला उष्ण हवामानाची गरज असते. आपल्याला अधिकाधिक फुले हवी असल्यास हे झाड जास्तीत जास्त ऊन असलेल्या ठिकाणी राहील असे पाहावे. अर्थातच यास पाणी आणि खते हे घटक देखील जबाबदार आहेत. 


पाणी 

या पृथ्वीतलावरील प्रत्येक जीवाला पाण्याची गरज असते. जास्वंदीच्या झाडाला ओलावा धरून ठेवणारी पण तितकीच लवकर कोरडी होणारी जमीन गरजेची असते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा वातावरणामध्ये उष्णता असते तेव्हा पाण्याचे प्रमाण वाढविले पाहिजे आणि जेव्हा उष्णता कमी असते म्हणजे पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये पाणी कमी दिले पाहिजे. माती ओली असेल तर पाणी घालणे टाळावे. 


खते आणि आवश्यक द्रव्ये   

प्रत्येक झाडास योग्य प्रकारे वाढीसाठी नायट्रोजन, फॉसफरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम अशा मुख्य मूलद्रव्यांची गरज असते. जमिनीतील झाडाला मातीमधून ही मूलद्रव्ये मिळत असल्याने वेगळी खते द्यावी लागत नाहीत. म्हणूनच आपण बघतो ना गावाकडे काहीही खते न घालता झाडे छान फुले देतात. पण कुंडीतील झाडाला खते न दिल्यास फुले येत नाहीत. तुम्ही  नायट्रोजन, फॉसफरस, पोटॅशियम असलेली रासायनिक खते देऊ शकता किंवा शेणखत, कोंबडीखत, हाडांचे खत, गांडूळ खत अशी नैसर्गिक खते देखील देऊ शकतो. मी स्वतः नैसर्गिक खते वापरतो. यामध्ये प्रामुख्याने कांद्याचे पाणी, अंड्याचे पाणी, अंड्याचा चुरा, केळ्याच्या साली पासून बनवलेले खत, तसेच कम्पोस्ट आणि गांडूळ खत इत्यादी खते मी वापरतो. 


कीटकांचा प्रादुर्भाव

मोगरा इत्यादी फुलझाडांपेक्षा जास्वंदीला कीटकांचा प्रादुर्भाव जास्त होतो त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये रेड माईटस, मिली बग्ज, मावा (व्हाईट फ्लाय), अफीड्स इत्यादी किडी लागतात.  कीड लागण्याचे प्रमुख कारण हे झाडांची न राखलेली स्वच्छता होय. त्यामुळे रोजच्या रोज झाडांच्या पानांवर पडलेली धूळ माती ही पानांवर पाण्याचा फवारा मारून धुतल्यास झाड टवटवीत राहते आणि कीड लागत नाही. जर कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यास कडुनिंबाचे तेल, लसूणच्या पाकळीचे पाणी, तसेच भांडी घासण्याचा साबणाचे पाणी यांचा तीन दिवसाआड फवारा करावा. तसेच फवारणी केल्यावर झाड सावलीत ठेवावे. उत्तम परिणाम दिसेल आणि कीटक नाहीसे होतील. 

जास्वंदीची घरच्या घरी लागवड 

जास्वंदीच्या झाडाचे फांदीपासून नवीन रोप तयार करता येते आणि लागवडी नंतर फक्त  सहा महिन्यात छान फुले लागतात असा माझा अनुभव आहे. साधारण माध्यम जाडीची फांदी तोडून तिला दालचिनी पावडर आणि हळद यांच्या मिश्रणामध्ये दोन तीन तास ठेवा. यामुळे झाडाला संसर्ग होत नाही. नंतर ती फांदी मातीत किंवा पाण्यात रुजविल्यास त्यास मुळे फुटतात आणि निरोगी झाड निर्माण होईल.



सर्वात महत्वाच्या काही गोष्टी (टिप्स)


  • जेवढ्या जास्त फांद्या तेवढी जास्त फुले येतात.  त्यामुळे जास्वंदीला सतत छाटत राहिले पाहिजे. म्हणजे झाडाची उंची न वाढता डेरेदार झाड तयार होऊन फुले धरतात. 

  • भरपूर सूर्यप्रकाश हा फुले येण्यास गरजेचं आहे. योग्य सूर्युप्रकाशामुळे झाडाची वाढ चांगली होऊन ती अन्न तयार करतात आणि चांगली फुले येतात 

  • दररोज योग्य प्रमाणात पाणी देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पाणी देण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे. 

  • दर १५ दिवसातून एकदा कांद्याच्या सालीचे आणि केळ्याच्या सालीचे पाणी यामुळे भरपूर पोटॅशियम आणि फॉसफरस मिळेल झाडाची चांगली वाढ होईल 




तर मित्रहो अशा या सुंदर फुलझाडांची काळजी घेताना त्याचे इतर उपयोग देखील महत्वाचे आहेत नाही का. जास्वंदीच्या झाडाच्या फुलांच्या पासून जास्वंदी चहा करतात. फुलाच्या पाकळ्या वाळवून त्यापासून ग्रीन टी सारखा चहा तयार होतो. हा चहा गरम आणि थंड देखील घेऊ शकता. सध्याच्या कोरोनाच्या साथीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लागणारे व्हिटॅमिन सी हा घटक तुम्हाला या चहा मधून मिळेल. तसेच जास्वंदीची पाने केसांच्या वाढीसाठी तेलामध्ये घातली जातात. 

अशा या बहुपयोगी जास्वंदीसाठी एक कविता मनात सुचली नसेल तर नवलच नाही का !


रंगांची उधळण करण्या घेऊन मी आले  |

गणरायाच्या कालिकेच्या गळ्यात मी ल्याले  ||


माझ्या फुलण्याने सारेही आनंदित झाले  |

कोमेजणार मी ज्ञात असूनही सर्वा प्रिय झाले  ||

लाभले आयुष्य जितके तितकी उपयोगी झाले  |

सार्थकी लागले जनाला आनंद देउनी गेले  ||

ऋणानुबंध तो जपावयाची शिकवण देते झाले |  मातीमधुनी उभारण्याची प्रेरणा देऊनी गेले ||

धन्यवाद !   मित्रहो ! हा लेख तुम्हाला आवडल्यास माझ्या वेबसाईट वर प्रतिक्रिया देण्यास तसेच तो शेअर करण्यास विसरू नका !   


1,209 views19 comments

Recent Posts

See All
Post: Blog2_Post
bottom of page