पेरला देव मी ! चितळे बंधूंची ही एक जाहिरात नुकतीच आलीये. एका कुटुंबाचा बाप्पा तोही त्यांच्या बाल्कनीतील झाडांच्या रूपात. कल्पनाच किती भन्नाट आहे नाही का. जाहिरात पहिली आणि आमच्या संपादकांनी मला फोन केला. अहो वायकर असा वृक्ष गणेश आपल्या डोंबिवलीकरच्या वाचकांना वृक्ष गणेशाची ओळख नको का ? मग मन विचारात पडले आणि या लेखाचा जन्म झाला.
वाचकहो ! गणेश चतुर्थी हा आपल्या सगळ्यांच्या आवडता सण. मुंबई सारख्या मोठ्या शहरात काही दिवस आधीच फुले आणि पत्रींनी बाजार अगदी फुलून जातात. पण गेल्या काही वर्षात या पत्रींची आणि फुलझाडांची संख्या कमी होत चालली आहे. जंगले नष्ट होताहेत आणि माणूस काँक्रीटच्या जंगलात निसर्गाचा सहवास विसरत चालला आहे. त्यामुळे या सणात बाप्पाला लागणारी फुले आणि पत्री घरच्या घरी कुंडीमध्ये वाढविता येतील का असा विचार आपल्याला पडला असेलच. तर वाचक हो खरं आहे या पत्री आणि फुले यांची झाडे घरच्या घरी बाल्कनी मध्ये कुंडी मध्ये वाढविता येतात. गणपतीची पूजा करताना २१ प्रकारची पत्री म्हणजे पाने आणि फुले वाहिली जातात, शास्त्रानुसार त्यांचा अर्थ आहे आणि औषधी उपयोग देखील आहेत. त्यामुळे हि झाडे कुंडीमध्ये कशी वाढवावीत, त्यांची निगा कशी राखावी या बद्दलची माहिती देणारा हा लेख.
१. जास्वंद
आपल्या लाडक्या गणेशाचं आगमन झालय, घरोघरी मोठ्या धामधुमीत गणेशोत्सव साजरा होतोय. या आपल्या बाप्पाला प्रिय असणारे महत्वाचे फुल म्हणजे जास्वंद. याचे शास्त्रीय नाव हिबिस्कस रोझा सायनेन्सिस आहे. इंग्रजी मध्ये याला हिबिस्कस, चायनीज शु फ्लॉवर, किंवा चायनीज रोज तर संस्कृत मध्ये जपा असेही म्हटले जाते. हि झुडूप वर्गीय वनस्पती असून तिची उंची १० फूट पर्यंत वाढू शकते. परंतु कुंडी मध्ये लावल्यास तुम्ही तिचा आकार हवा तसे ठेवू शकतात. लाल. सफेद, निळा, पिवळा, गुलाबी, जांभळा हे तिचे नेहमीचे रंग असून तिचे पाच, चोवीस आणि छत्तीस असे तीन प्रकार आहेत. यांच्या हायब्रीड प्रजाती देखील उपलब्ध आहेत. माझ्या घरी २१ वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद आहे.
चार ते आठ इंचाच्या कुंडी मध्ये लावू शकता. प्रथम एक कुंडी घ्या आणि तिला ४-५ छिद्रे पाडून खाली दगडांचा एक थर लावा. मग कडुनिंबाची पेंड टाका. आता रोपवाटिकेमधून आणलेली प्लास्टिक बॅग कापून मुळांचा आणि मातीचा गठ्ठा ठेवा. बाजूने शेणखत किंवा गांडूळ खत यांचा थर द्या मग थोडीशी वाळू आणि मातीच्या मिश्रणाने कुंडी भरा आणि शेवटी पुन्हा एकदा शेणखताचा थर द्या. जास्वंदीला भरपूर सूर्य प्रकाश लागतो. दररोज चार ते आठ तासाच्या सूर्यप्रकाशामुळे भरपूर फुले येतात. अशी हि जास्वंदी कुंडीत लावून गणपतीला वाहू शकता.
२. तेरडा / गौरीचे फुल
इंग्रजी मध्ये बाल्सम या नावानी ओळखली जाणारी हि वनस्पती मुख्यतः पावसाळ्यात येते. मे ते जून मध्ये हिच्या बिया टाकल्यास गणपती गौरी पर्यंत हिची फुले येतात. जुलै ते डिसेम्बर हा यांचा काळ आहे. आपली विशिष्ट प्रतिमा जपून ठेवणारे हे झाड आहे. तेरड्या मध्ये एकेरी आणि दुहेरी असे प्रकार आहेत. सफेद, गडद गुलाबी, हलका गुलाबी, लाल, जांभळा असे रंग या मध्ये येतात. पाच ते सहा दिवस हे फुल झाडावर टिकते. मग फुल गळून पडल्यावर छोटी फळे लागतात ज्यामध्ये बिया असतात. याच बिया पासून नवीन रोपे तयार होतात. एका बी पासून फुले येण्यापर्यंत साधारण ४० ते ४५ दिवसांचा कालावधी जातो. बी टाकल्यावर आठ दिवसात रोप तयार होते आणि झाड पंधरा दिवसांचे झाले की कंपोस्ट / शेण खत टाकल्यास कळ्या तयार होतात आणि पुढील २०-२५ दिवसात भरपूर फुले तयार होतात. चला तर आहे सुंदर, रंगीत आणि कमी पाण्यात येणाऱ्या तेरड्याला जागा करूयात.
३. कण्हेर
इंग्रजी मध्ये ओलीअँडर असे म्हटले जाणारे हे एक झुडूप आहे. हे सर्व ऋतूत येणारे सदा बहरणारे आणि कायम पाने असणारे झाड आहे. हे कुंडीमध्ये देखील आपण लावू शकतो. सध्या हायब्रीड प्रकारची कण्हेर देखील उपलब्ध असून १०-१२ इंचाच्या कुंडीमध्ये एका फांदीला १०-१२ फुले अशी लागतात. सुवासिक तसेच लाल, पिवळा, गुलाबी आणि सफेद या रंगानी आकर्षून घेणारे हे झाड सगळीकडे लावता येते. घराच्या बाल्कनी मध्ये ४-५ तासाच्या सूर्यप्रकाशात हे झाड उत्तम वाढते आणि त्यास छान फुले देखील येतात. या झुडपांची उंची ३-४ फूट होते आणि कुंडीत चॅन डेरेदार वाढते.
या झाडास फारसे पाणी लागत नाही त्यामुळे ७ दिवसातून २-३ वेळेस अगदी थोडेसे देखील पाणी चालते. फुले येण्यासाठी वाळलेली केळ्याची साल आणि कम्पोस्ट यांचा वापर करावा. कण्हेरीला जास्त वाढू न देता सारखे छाटत राहिल्याने जास्त फांद्या फुटून फुले जास्त येतात.
चला तर बाल्कनी मध्ये कण्हेर लावा आणि रंगीबेरंगी फुलपाखरांना आकर्षित करूया.
४. विष्णुकान्ता
या वनस्पतीला शंखपुष्पी असेही म्हणतात. हिचे शास्त्रीय नाव इव्हॉल्व्हस अलसींनोइड असे आहे. अतिशय सुंदर निळ्या रंगाची फुले येणारी हि वनस्पती गणेश पूजनात वापरली जाते. सध्या दुर्मिळ वर्गातील या वनस्पतीची लागवड करणे गरजेचे आहे. या वनस्पतीला शंखवेल असेही म्हणतात. ४-८ इंचाच्या कुंडीत सहज येणारे हे झाड वेल आणि झुडूप या दोन्ही प्रकारात मोडते. कुंडीत लावताना वाळू, माती आणि शेणखत सम प्रमाणात मिसळावे. जास्त वाढू न देता सारखे छाटत राहिल्याने जास्त फांद्या फुटून येतात. लक्षात ठेवा जेवढ्या जास्त फांद्या तेवढी जास्त फुले. नवीन पळविला खुडल्याने झाड छान भरेल. केळ्याची वाळलेली साल आणि टोमॅटोचा रस घातल्याने झाडाला जास्त प्रमाणात पोटॅशियम मिळते. टोमॅटोचा रस झाडावर फवारल्याने फुले जास्त येतात. या निळ्या रंगाच्या सुंदर फुलांनी तुमची बाग छान बहरेल कि नाही बघा. चला तर बाल्कनी मध्ये विष्णुकान्ता लावू आणि बाप्पाला अर्पण करू.
५. जाई
जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी .. एकांती मज समीप ... या तोच चंद्रमा नभात या गाण्यामुळे हि वेल आपल्याला परिचित आहेच. हिला इंग्रजी मध्ये जस्मिन असेही म्हणतात. शास्त्रीय नाव जास्मिनम ओरीक्युलाटम असे आहे. हे एक प्रकारचे सुगंधी फुल असून तिचा वेलवर्गीय वनस्पती मध्ये समावेश होतो. सामान्यतः सगळ्यांना पांढरी जाई माहिती असते. पण हिची पिवळी रंगाची देखील प्रजाती उपलब्ध असून ती दुर्मिळ आहे. माझ्या कडे या दोन्ही असून छोट्या कुंडीत छान वाढत आहेत. ८ ते १० इंचाच्या कुंडीत रोपवाटिकेतील झाड लावू शकता. भरपूर सूर्यप्रकाश आणि ओलावा टिकवून ठेवणारी माती यांची योग्य सांगड घातल्यास जाई फुलांचा सुगंधित वास वर्षातील ७-८ महिने अनुभवू शकता. गणेशाला सुगंधित फुल म्हणून जाई अर्पण केली जाते. जाईची फुले हि नवीन फांद्यांवर येतात म्हणून जाईला वर्षातून एकदा छाटणे फार महत्वाचे आहे जेणेकरून झाड जास्त पसरेल आणि फुले देखील जास्त येतील. जाई इतर वेळेप्रमाणे मांडवावर किंवा सोसायटीच्या कंपाउंड वर छान चढते आणि पसरते. हिची फुले सायंकाळी / रात्री फुलतात. फुलांचा मंद सुगंध दूरवर पसरतो त्यामुळे फुलांना विशेष महत्व आहे. सुकल्यावर हि फुले पांढरी होतात. हा वेल हस्त नक्षत्राचा आराध्य वृक्ष देखील आहे.
६. केवडा
केवड्याच्या बनात .. अशा गाण्यामुळे आपल्याला केवडा परिचित आहे. पांडानाशिया फॅसीक्यूलॅरीस असे याचे शास्त्रीय नाव आहे. गणेशाच्या आवडीचा पिवळाधमक, सुगंधी केवडा आरास करताना फार विलोभनीय वाटतो नाही. गौरीच्या देखील केसांच्या खोप्यामध्ये हा उठून दिसतो. हे झाड १२-१५ इंचाच्या कुंडीमध्ये सहज वाढते. याची पाने काटेरी असतात आणि पानांच्या मध्ये कोरफडीच्या झाडासारखे कणीस येते ज्याला सुगंध असतो. केवड्याला वाळू आणि खत युक्त माती लागते पण पाण्याचा निचरा होणे फार गरजेचे आहे. भरपूर सूर्यप्रकाश आणि ओलावा धरून ठेवणारी माती या झाडाला पोषक आहे. केवड्याला पोटॅशियम आणि फॉसफरस असलेली खते दिल्यास छान कणसे येतात. थोडीशी जास्त मेहनत आणि योग्य खतांचा वापर यामुळे बाप्पाला तुमच्या बाल्कनी मधील केवडा अर्पण करणे भाग्याचे आहे नाही का ..
७. हरळ किंवा दुर्वा
गणपती अतिशय प्रिय असणारी आणि सहजरित्या तणासारखी वाढणारी गवताच्या कुळातील हि एक वनस्पती आहे. छोट्याशा कुंडीत शेणखत, माती आणि कंपोस्ट खत घालून छोट्या बिया ८-१० इंचाच्या कुंडीत टाका. पावसाळी वातावरणात ८ दिवसात रोपे येऊन ३० दिवसात छान रान तयार होऊन गणेश पूजेला दुर्वा वापरता येतील. नेहमीच्या हिरव्या दुर्वे बरोबरच दुर्मिळ अशी पांढरी दुर्वा देखील वेगळी प्रजाती आहे. नवीन येणारी फूट हाताने खुडली असता खालच्या बाजूने नवीन फूट येईल आणि दुर्वांची कुंडी भरून जाईल. इतर कोणत्याही रासायनिक खताशिवाय हि वनस्पती सहज वाढते. माध्यम स्वरूपाचे पाणी (आठवड्यातून ३-४ वेळेस) घातल्यास दुर्वा चांगल्या येतात. जास्त पाण्याने दुर्वा सडण्याची भीती असते.
८. शमी
गणेश पूजनात महत्वाचे स्थान असलेल्या शमीला आपण ८-१० इंचाच्या कुंडी मध्ये वाढवू शकतो. चिचे सारखी दिसणारी छोटी पाने हे या झाडाचे वैशिष्टय आहे. भरपूर सूर्य प्रकाश या झाडाला गरजेचं असतो. शेणखत, माती आणि गांडूळ खत घातल्यास झाड छान बहरते.
हे झाड खूप उंच वाढते त्यामुळे त्याचे बोन्साय करता येऊ शकते. झाड लहान असतानाच फांद्या छाटत राहिल्याने झाड डेरेदार होईल. कालांतराने छोटी मुळे कापत राहिल्यास २ वर्षात बोन्साय तयार होईल. घराच्या उजव्या बाजूस हे झाड लावावे असे वास्तुशास्त्र सांगते. म्हणून या झाडाला महत्व आहे. तसेच आपल्या बाप्पाच्या रोजच्या पूजेत याची पत्री वाहिल्यास उत्तम फलप्राप्ती होते असे गणेशपुराण सांगते.
९. तुळस
प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून असलेली हि झुडूपवर्गीय वनस्पती आहे विष्णूस प्रिय असणारी हि वनस्पती कॅन्सर वर उपयुक्त आहे. हे एकमेव झाड असे आहे कि ते संपूर्ण दिवस आणि रात्र देखील प्राणवायू देते. गणेश चतुर्थीच्या दिवशी फक्त तुळस गणपतीला वाहण्याचा प्रघात आहे. उष्ण वातावरणात वाढणारे हे झुडूप तिच्या मंजिऱ्या म्हणजेच बिया मातीत टाकल्यावर छान येते.
तुळस जास्त काळ जगवायची असेल तर मंजिऱ्या आल्या कि लगेचच त्या आणि खालची पाने खुडून टाकावीत त्यामुळे झाडाला पाने टिकून राहतात आणि झाड छान बहरते आणि तुमच्या बाल्कनीला एक वेगळा लूक प्राप्त होईल. भरपूर सूर्यप्रकाश, शेणखत आणि योग्य पाणी हे तुळस जगविण्यास गरजेचे आहे. लक्षात ठेवा तुळशीच्या कुंडी मधील माती सुकली नसल्यास पाणी घालू नये कारण त्याने तुळस लवकर मरते.
१०. बेलपत्र
बेल वृक्षाला शंकराचा प्रिय वृक्ष म्हटले गेले आहे. फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच आपण बेल गणेशास वाहतो. बेलपत्र म्हणताच ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र मनात येतोच. आमच्या घरी बेलाचे झाड गेले ३ वर्षे १२ इंचाच्या कुंडी मध्ये आहे. छोटे रोप हे रोपवाटिकेतून आणून किंवा बेलाच्या फांदी पासून देखील वाढविता येते. वाळू, माती आणि कंपोस्ट खत घेऊन बेलाचे झाड लावू शकता. उष्ण तापमान, स्वच्छ सूर्य प्रकाश, आणि माध्यम स्वरूपात पाणी यामुळे बेल छान वाढतो. बेलाचे बोन्साय देखील करता येऊ शकते.
११. धोत्रा
भारतात अगदी मुबलक प्रमाणात उगवणारी हि आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिंदी मध्ये धतुरा असे म्हटले गेलेल्या या झाडाचे फळ विषारी आहे. महादेवाला धोतऱ्याचे फळ तर गणेशाला पान अर्पण केले जाते.
आपल्याकडे सफेद धोत्रा प्रसिद्ध आहे. याच्या बिया ८-१० इंचाच्या कुंडीत टाकून झाड वाढविता येते. कोणत्याही प्रकारच्या मातीत येणारे हे झाड भरपूर सूर्यप्रकाश आणि पाणी यामुळे छान वाढते. नवीन फुटवे तोडल्यास झाड छान बहरते. बी रुजल्या पासून ६०-९० दिवसात फुले पूजेला मिळतात. धोत्रा वाढविताना हवेत उष्णता जास्त असल्यास पाणी जास्त टाका तर कमी असल्यास पाणी नाही टाकले तरी चालेल म्हणजे मुळे सडणार नाहीत. जास्त फुले येण्यासाठी पोटॅश युक्त खत किंवा वाळलेली केळीची साल टाकावी.
१२. डाळींब
इंग्रजी मध्ये प्यूनिका ग्रानाटम असे नाव असलेल्या या झुडुपाला गणेश पूजेत "दाडिमपत्रं समर्पयामि " असे म्हणून अर्पण केले जाते. डाळिंब म्हटले कि लाल चुटुक दाणे असलेले फळ होय. डाळिंबाची शेती करत जरी असले तरी आजकाल हायब्रीड जातीची डाळिंबाची बियाणे उपलब्ध आहेत जी आपण १०-१५ इंचाच्या कुंडीत लावू शकतो. ३-४ फूट उंचीचे झाड झाल्यावर त्यास फळे लागतील.
वाचक मित्रांनो आपल्या लक्षात आलेच असेल कि आजच्या फ्लॅट संस्कृती मध्ये असलेल्या छोट्या बाल्कनी मध्ये ४ इंच ते १५ इंचाच्या कुंडी मध्ये गणेश पूजेला लागणारी फुले आणि पत्री कशाप्रकारे कमी जागेत लावू आणि वाढवू शकता.
शेवटी प्रत्येक झाडाला वाढविण्यासाठी काही महत्वाचे नियम पाळणे गरजेचे आहे. फुलझाडांना कुंडीत वाढविताना भरपूर सूर्युप्रकाश असणे आणि पत्रींना वाढविताना सूर्यप्रकाश आणि मुबलक पाणी गरजेचे आहे. सेंद्रिय खते जसेकी कम्पोस्ट, शेण खत, गांडूळ खत, सोनखत, लेंडी खत, व्हर्मी वॉश अशी खते चांगली फुले आणि पाने देतात. या बरोबरच भरपूर फुले येण्यासाठी पोटॅशियम युक्त खते घालावीत. कॉफी पावडर, वाळलेल्या केळ्याची साल, टोमॅटो चा रस घालावा त्यामुळे भरपूर फुले येतील. पानांच्या वाढीसाठी नायट्रोजन युक्त खत घालावे जसेकी शेणखत.
दर दोन वर्षांनी झाडांची माती बदलून शेणखत, कम्पोस्ट आणि कडुनिंबाची पेंड वापरून कुंडी पुनर्भारित करावी तसेच झाडांची छोटी मुळे छाटून नवीन माती घालावी त्यामुळे झाड जोमाने वाढेल आणि तेवढ्याच कुंडीत ८-१० वर्षे जगेल. झाडाची पाने पिवळी पडणे हे जास्त पाणी असल्याचे लक्षण आहे त्यामुळे त्याकडे लक्ष हवेच.
वरील काही गोष्टी अमलात आणून घरच्या घरीच स्वकष्टाचे वाढविलेली फुले आणि पत्री जर गणपतीला वाहिली तर बाप्पा नक्कीच प्रसन्न होईल. चला तर मग या चतुर्थीला एक तरी झाड नक्की लावू आणि बाप्पा ची कृपा प्राप्त करू
Comments