मुंबईच्या मायानगरी मध्ये जन्म घेणं आणि राहणं हे भाग्यचंच लक्षण म्हणावं लागेल. गेली काही वर्षे इथे राहताना आणि वाणिज्य क्षेत्रात काम करताना वेगवेगळे अनुभव गाठीशी बांधले हे मात्र खरं. एक दिवस पवई हुन अंधेरीला ऑफिसच्या कामानिमित्ताने बसने प्रवास करण्याची वेळ आली. शेजारी एक कॉमर्स क्षेत्रातला मुलगा फोन वर बोलत होता. खूप चिंतेत होता तो. ६५% पडून देखील नोकरी नाही असेच काहीसे तो सांगत होता. मी त्याचा फोन झाल्यावर सहजच विचारलं, "काय रे काय झालं ?" तो म्हणाला, "बघा न सर आर्थिक परिस्थिती नाही म्हणून कॉमर्स घेतलं, खूप अभ्यास केला, मार्क पण चांगले मिळाले आहेत, आता बँकेच्या नोकरी साठी अर्ज करतोय तर कुठेच काम होत नाहीये. काय करू सर ?". त्याचे हे बोल ऐकून खरोखरच माझ्या डोक्याची चक्रे फिरू लागली. आणि लक्षात आले की आजची पिढी हि कॉमर्स क्षेत्रात फक्त बँकेत नोकऱ्या शोधतेय . त्यांना या क्षेत्रातल्या नवनवीन आणि वेगळ्या वाटाच माहिती नाहीयेत. मी विचार केला अंधेरी येईपर्यंत याला थोडे मार्गदर्शन करू. साकीनाका आणि चकाला येथे खूप ट्रॅफिक जॅम असल्याने सुमारे अर्धा तास कसागेला हे कळलेच नाही. त्याला सांगितलेल्या "चार युक्तीच्या गोष्टी" च आता मी तुम्हाला सांगतोय.
बरेचसे अवघड विषय जसे कि कॉर्पोरेट अकौंटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, बँकिंग, इकॉनॉमिक्स, टॅक्सेशन, आणि बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन यांमुळे बीकॉम हा खूपच माहिती पुरविणारा आणि उत्सुकता वाढविणारा विषय आहे.
बीकॉम च्या आधारावर बऱ्याचश्या नोकरीच्या संधी आहेत. त्या कोणत्या आणि त्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतील ते पाहुयात.
आजच्या घडीला बर्याचश्या कंपन्या कॉमर्स पदवी धारकांच्या शोधात कारण नेहमीच्या बिझनेस ऑपरेशन्स मधील ही या पदवीधारकांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. कोणत्याही अडचणी शिवाय नोकरीच्या संधी काय आहेत त्या खालीलप्रमाणे:
अकौंटिंग आणि ऑडिटिंग
ऑपरेशन्स मॅनेजमेंट
फायनान्शियल सर्व्हिसेस
टॅक्स ऍडव्हायजरी
कर्मशियल बँकिंग
इन्शुरन्स सर्व्हिसेस
टेलिकम्युनिकेशन्स आणि बीपीओ / केपीओ
उत्पादन सेवा
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (मानवी व्यवस्थापन)
१. अकौंटिंग आणि ऑडिटिंग
नोकरीच्या सर्वात जास्त संधी असलेले हे क्षेत्र आहे. बी कॉम पदवीधारक सी ए किंवा सी एस चा खडतर मार्ग न पत्करता देखील कंपन्यांमध्ये काम करू शकतात. यामध्ये ज्युनियर अकाउंटंट, सिनियर अकाउंटंट, अकाउंट मॅनेजर अशा पायऱ्या पार कराव्या लागतात. या पदांसाठी छोट्या कंपन्यांपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंत नोकरीसाठी अर्ज केले जाऊ शकतात. रिलायन्स, टाटा, इन्फोसिस, विप्रो, एल अँड टी, या कंपन्या देखील फ्रेशर्स (नुकतेच बीकॉम झालेल्या) ना घेतात. एक पाहिजे की या क्षेत्रासाठी तुमचे फायनान्स आणि अकाउंट्स चे ज्ञान अद्ययावत असले पाहिजे. काही खाजगी सीए कंपन्यामध्येही ऑडिटिंगच्या कामासाठी बीकॉम पदवीधारक अर्ज करू शकतात. एखाद्या कम्पनीचे विलीनीकरण, किंवा अधिग्रहण करायचे असेल तर ड्यू डिलिजन्स प्रकारचे ऑडिट करण्यास बीकॉम पदवीधारक फार मोलाचे आहेत.
२. ऑपरेशन्स मॅनेजमेंट
मूलतः प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी या क्षेत्रात आहेत. या क्षेत्रात काम करायचे असेल तर उत्तम संवाद कौशल्ये (ज्यामध्ये इंग्रजीचा मुख्य समावेश होतो), रिझनिंग कौशल्य या बरोबरच मायक्रोसॉफ्ट एक्सेल चे उत्तम ज्ञान (ज्यामध्ये शॉर्टकट कीज चा देखील समावेश होतो) असलेच पाहिजे. हे असल्यास एक्झिक्युटिव्ह पासून ते मॅनेजर पर्यंतचा टप्पा सहज पार होईल. ऑपरेशन्स चे क्षेत्र हे खूपच भव्य, व्यापक आहे. आयटी, एचआर, व्यवस्थापन (ऍडमिन), फायनान्स, फार्मा, आणि मार्केटिंग अशा सर्वच क्षेत्रात ऑपरेशन्स चे काम असते आणि त्या सगळ्या क्षेत्रात बीकॉम पदवीधारकांना प्राधान्य दिले जाते. स्वानुभवाने सांगतो की करियर घडविण्यासाठी हे क्षेत्र अतिशय उत्तम आहे.
३. फायनान्शियल सर्व्हिसेस
फायनान्स हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. म्हणून फायनान्शियल सर्व्हिसेस या क्षेत्रात काम करणारे सर्वात जास्त लोक तुम्हाला कॉमर्स क्षेत्रातील आढळतील. जसे कि महिंद्रा फायनान्स, श्रीराम फायनान्स, डीएचएफएल, इंडियाबुल्स, एलआयसी हौसिंग फायनान्स यांची उत्पादने तसेच सेवा यांची विक्री करणेत तसेच या कंपन्यांच्या ग्राहक सेवा प्रतिनिधी या स्वरूपाच्या कामांसाठी देखील बीकॉम पदवीधारकांना प्राधान्य दिले जाते.
या क्षेत्रामध्ये बीकॉम पदवीधर हे फायनान्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स ऑफिसर, फायनान्स मॅनेजर, एरिया मॅनेजर, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, आणि टीम लीडर या हुद्द्यांवर त्यांना असलेल्या अनुभवाच्या आधारे काम करू शकतात.
४. कमर्शियल बँकिंग
आजच युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे बँकिंग वाहिन्या / चॅनेल्स ची नितांत गरज असणार आहे. या वेगाने वाढणाऱ्या चॅनेल्सचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच त्याचे नियमन करण्यासाठी बीकॉम पदवीधरांची आवश्यकता आहे.
म्हणूनच खाजगी क्षेत्र, सरकारी क्षेत्र, शेड्युल्ड आणि को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये सेवेच्या विस्तारीकरणासाठी बी कॉम पदवीधरांची नियुक्ती केली जाते. कॅशियर, अकाउंटंट, ऑफिसर, क्लर्क, या पारंपरिक नोकऱ्यांबरोबरच रिलेशनशिप ऑफिसर, कम्प्लायन्स ऑफिसर, रिस्क ऑफिसर, ऑडिटर, ट्रेनर, सेल्स ऑफिसर या अनेक संधी उपलब्ध आहेत. एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, येस बँक, इत्यादी आघाडीच्या बँकादेखील बीकॉम ला संधी देतात.
भीम ऍप, फोनपे, पेटीएम अशा अनेक नवीन बँकिंग उत्पादनांमुळे तेथे देखील अनेक संधी उपलब्ध आहेत.
याबरोबरच बँक ऑफ अमेरिका, डॉईश बँक, एचएसबीसी अशा परदेशी बँकांमध्ये देखील फॉरेन एक्स्चेंज विभागासंदर्भात अनेक संधी आहेत.
४. टॅक्स ऍडव्हायजरी / टॅक्स कन्सल्टंट
बीकॉम झाल्यावर जर तुम्हाला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट टॅक्स या क्षेत्रात काम करायचे असेल तर बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. बीकॉम कन्सल्टंट स्वतःचा टॅक्स कन्सल्टन्ट म्हणून देखील व्यवसाय सुरु करू शकतात. यालाच जर शेअर मार्केटशी संबंधित सेवा आणि सल्ला यांची जोड दिली तर आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचा दुसरा मार्ग नाही.
आपल्याकडे टॅक्स भरणारा वर्ग मोठा नसला तरी नोकरदार, व्यवसायिक याना टॅक्स फाईल बनविण्याची गरज असते. आयकर चे इ फायलिंग करून देणे, तसेच गेल्या २ वर्षांपासून आलेल्या जीएसटीचे महिन्याचे (३ बी), त्रैमासिक (१) आणि वार्षिक (९) इत्यादी रिटर्न्स भरणे हा देखील मोठा व्यवसाय होऊ शकतो. संगणकाचे उत्तम ज्ञान, एक्सेल तसेच अकौंटिंगचे ज्ञान (ज्यात टॅली, क्विकबुक्स अशा सॉफ्टवेअरचे ज्ञान देखील आले) असल्यास करियर करणे अवघड नाही. सरकारी विभागात आयकर, प्रोफेशनल टॅक्स, जीएसटी, कस्टम इत्यादी विभागात काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
६. इन्शुरन्स सर्व्हिसेस
इन्शुरन्स म्हणजेच वीमा क्षेत्र हे पारंपारिकरित्या फायनान्शियल सेवा देणारे आणि बीकॉम पदवीधरांना नोकरी देणारे क्षेत्र होय.जनरल इन्शुरन्स आणि लाईफ (जीवन वीमा) असे या क्षेत्राचे दोन भाग आहेत. या क्षेत्रात बीकॉम पदवीधर हे इन्शुरन्स एजन्ट, रिलेशनशिप ऑफिसर, उत्पादन विकास अधिकारी, तसेच रिस्क ऑफिसर, ऑडिटर अशा प्रकारच्या नोकऱ्या करू शकतात.
७. टेलीकम्युनिकेशन आणि बीपीओ / केपीओ
भारत ही सेवा पुरवठा करणाऱ्या क्षेत्रातील खाण आहे. भारतामधून बऱ्याचशा बाहेरील देशांना सेवा पुरविली जाते. भारत आउट सोर्सिंग क्षेत्रात राजा आहे कारण कौशल्य असलेला शिक्षित वर्ग हे आपले वैशिट्य आहे. या क्षेत्रात फायनान्शियल सेवांपासून ते टेलिफोन ते मेडिकल बिलिंग पर्यंत अनेक सेवा येतात. यामध्ये बीकॉम पदवीधर ग्राहक सेवा अधिकारी, टीम लीडर, एरिया मॅनेजर, डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करता येते. आयडिया, एअरटेल, रिलायन्स, एडेलवाईज, कॅपजेमिनी, डब्ल्यूएनएस अशा अनेक कंपन्यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
८. उत्पादन / मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस
या क्षेत्रात देखील प्रचंड प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत. हुशार, आणि चुणचुणीत अशी बीकॉम क्षेत्रातील मुले / मुली या उत्पादन / मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील प्रोसेस संबंधित बऱ्याच कामात मदत करू शकतात. यामध्ये असिस्टंट इन्चार्ज, स्टोअर कीपर, स्टोअर इन्चार्ज, वेअर हाऊस एक्झिक्युटिव्ह, स्टोअर मॅनेजर, असेट मॅनेजमेंट अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. बऱ्याचशा संधी या जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, आणि महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी या सारख्या कंपन्यामध्ये उपलब्ध आहेत.
या बरोबरच इतर अनेक क्षेत्रे आहेत जेथे कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थी पाऊल ठेवू शकतो. एमबीएची पदवी तुमच्या संधी वाढविते हे लक्षात ठेव. आजकाल पूर्णवेळ, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी शनिवार रविवार असा अर्धवेळ, किंवा आजकाल दूरस्थ (डिस्टन्स) ऑनलाईन एमबीए देखील उपलब्ध आहेत. आपल्या आपल्या आर्थिक कुवती नुसार आपण हि पदवी घेऊ शकतो. एमबीए कोठून कराल यावर अनेक मतभेद असतीलच. आता बघ तू म्हणालास कि तुझी आर्थिक परिस्थिती फार छान नाही मग ऑनलाईन एमबीए कर. माझ्या अनुभवा नुसार सिक्कीम मणिपाल, आयटीएम, वेलिंगकर, अमीटी यांचे एमबीए सध्या जास्त प्रमाणात केले जाते. माझ्या ओळखीतल्या काही विद्यार्थ्यांसाठी मी त्यांना अवघड जाणाऱ्या विषयासाठी डोंबिवलीमध्ये माझ्या मित्राच्या इथे काही वर्ग घेत असतो. त्याचा त्यांना फायदा देखील होतो. डिस्टन्स एमबीएची फी कमी असल्याने एखादा क्लास लावला तर सहज चांगले मार्क प्राप्त होऊन संधीमध्ये वाढ होते. एमबीए करत असताना एचआर, ऑपरेशन्स, मार्केटिंग, जनरल, फायनान्स, प्रोजेक्ट अशा अनेक शाखा उपलब्ध असतात. आपल्या सध्याच्या नोकरी नुसार त्याची निवड आपण करू शकतो. आता हे लक्षात ठेव कि एमबीए केलंस म्हणून नोकरी मिळेलच असे नाही. नोकरी मिळविण्यासाठी इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व (जे वर्तमानपत्र आणि अशा इतर प्रयत्नांनी सहज प्राप्त होते), चांगला बायोडेटा, आणि लिंक्डइन सारख्या सोशल मीडिया चा उत्तम वापर करून तुला शक्य होईल. शेवटी एक महत्वाचे सांगेन कॉमर्सच काय पण इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लाते जिद्द, चिकाटी, सातत्य, मेहनत आणि यश मिळवून देखील जमिनीवर पाऊल राखण्याची कला.
Comments